पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण तयारी झाली असून गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली आर्थिक घडामोडींवर निर्णय घेणाऱ्या कॅबिनेट समितीची (Cabinet Committee on Economic Affairs) मंजुरी तत्काळ मिळावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे शून्यप्रहरादरम्यान बोलताना केली.
अंतिम टप्प्यात आलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्व ओळखून खासदार डॉ. कोल्हे यांना बोलण्याची संधी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. या संधीचा पुरेपूर उपयोग करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी जून २०२० मध्ये रेल्वे बोर्डाने या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली असून निती आयोग, वित्त आयोग, रेल्वे बोर्ड आदींची मंजुरी मिळाली असल्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधत केवळ Cabinet Committee on Economic Affairs ची मंजुरी प्रलंबित आहे. ही मंजुरी तत्काळ मिळावी अशी मागणी केली.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा केवळ दोन शहरे जोडणारा नसून उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सुवर्ण त्रिकोण आहे. या रेल्वेमार्गामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा या प्रकल्पाने बदलणार असल्याची भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने मांडली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात हा प्रकल्प बारगळणार अशी शक्यता वर्तवली जात असताना खासदार डॉ. कोल्हे यांनी आग्रही भूमिका घेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत असलेल्या आक्षेपांचे निराकरण करुन हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असे जाहीर केले होते. आज त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात पुन्हा एकदा या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली.