पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )
सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक येथील स्वीट मॉल मध्ये काजूकतली फुकट दिली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून स्वीट मॉलमध्येच गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथे घडली, याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी नामक स्वीट मॉल आहे, काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजूकतली घेतली दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला,त्यामुळे दुकानदाराने काजूकतली देण्यास नकार दिला.
या गोष्टीचा राग आल्यामुळे त्या तरुणांनी त्या दुकानात त्यांच्याकडे असलेले गावठी पिस्तूल बाहेर काढून गोळी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पहिल्यांदा गोळी बाहेर आली नाही नंतर पुन्हा त्या तरुणांनी पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली, मात्र गोळी दुकानातच पडली,हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी फार मोठी गर्दी जमा झाल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला.
घटना घडल्यानंतर दुकानदाराने पोलिसांना माहिती देताना खेळण्यातील बंदूक असल्याचे समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले मात्र परिसरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगूने यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना झालेला प्रकार सांगितला, पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी ताब्यात घेऊन तपासले असता, ती खरी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यामुळे घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोप आरोपींचा शोध सुरु करण्यात आला असून त्यात पोलिसांना यश आले असून एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेंच त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत, मात्र भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.