एकेकाळी हडपसर म्हणजे शांत उपनगर म्हणून गणले जायचं ! परंतु या दहाबारा वर्षात नुरच बदलला आहे. परंतु हल्ली हडपसर येथे सुध्दा गुन्हेगारी वाढल्याचे आढळून येत आहे. मारामाऱ्या, दहशतवाद, प्रेमप्रकरणे व त्यातून होणारे अत्याचार यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
त्यात आता नवीनच भर पडली आहे ती कोयता गँगची ! मला हडपसर येथे स्थाईक होऊन सुमारे 43 वर्षे झाली, या कालावधीत हडपसर मध्ये फक्त एकदाच दंगलसदृश्य घटना घडली होती. काळानुरूप विकास होत गेला. नोकरी/धंद्या निमित्ताने हडपसरची लोकसंख्या तीन लाखावर पोहचली. आपापसातील स्नेह हळूहळू कमी होत आहे असे वाटायला लागलं आहे. शांत आशा हडपसरला दृष्टलागली की काय असे वाटायला लागलं आहे.
अशावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील ओवी आठवते ! दुर्जनांचा सुकाळ झाला की, अशांतता निर्माण होते. दुर्जनांना दुर ठेवले तरच सज्जनांना हायसे वाटते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात:
दुर्जनाची गंधी विष्टेचिये परी |
देखोनिया दूरी व्हावें तया ||
दुर्जनांना आपल्या पासून नेहमी दूरच ठेवावे. कारण ही संगत विष्टे पेक्षाही जास्त दुर्घंदी असते अशा वेळी त्याच्या जवळ गेले तर जसा त्रास सहन करावा लागतो तसेच दुर्जंनांचा त्रास सहन करावा लागतो. कारण यांचा सहवास समाजाला घातकच असतो, त्यामुळे त्यांच्या पासून चार हात दूर असावे. कारण दुर्जंनांच्या अंगी सज्जनपणा नसतो, यासाठी त्यांच्याशी संग भला नव्हे.
म्हणून तुकाराम महाराज सांगतात,
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग |
बोलिलासे त्याग देशाचा त्या ||
थोडक्यात आम्हाला असं म्हणायचं आहे की, आपल्या जवळपास असे काहीं दुर्जन आढळून आले तर तत्परतेने पोलीस यंत्रणेला कळवायला हवे. आपले घर भाडेकरूला देण्या अगोदर त्याची शासन दरबारी नोंद करायला हवे जेणेकरुन परिसरात गुंडगिरीला आळा बसू शकेल.
हल्ली प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. प्रेम आंधळ असते असे पूर्वी म्हणत ! परंतु आता काळ बदलला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या मुलींना/महिलांना लग्नाचे आमिश दाखवून त्यांना त्यांच्या जीवनातून उध्वस्त केले जाते आहे ! यासाठी माय बहिणींनी डोळसपणे प्रेम तेही चारचौघांना विश्वासात घेऊन करायला हवं ! एखाद्याच्या अधीन होऊन सर्वस्व बहाल करण्या अगोदर त्याची व कुटुंबातील व्यक्तींची माहिती घ्यायला हवं असे वाटते. हे थोडे अवघड असलेतरी आवश्यक आहे असे वाटते !
पालकांनी आपले मुलं/मुली शाळा, महाविद्यालया व्यतिरिक्त काय करतात, कुठे जातात, त्यांचे सोबती/मित्रमंडळी कशी आहे याकडे सुध्दा बारकाईने लक्ष ठेवायला हवे. यातून पुढील अनर्थ आपल्या जवळपास फिरकणार नाही !
आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो आहोत असे वाटतं असलेतरी त्याची आवश्यकता वाटत आहे इतकेच !
सुधीर मेथेकर – उपसंपादक – रोखठोक महाराष्ट्र न्युज