पुणे, दि. २१: राज्य शासनाने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी अशा ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची’ या अभियानाचा पुणे जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत राजा रघुनाथराव महाविद्यालय भोर येथे करण्यात आला.
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यात ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भोर येथे हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराजस्व अभियानांतर्गत विविध लाभही पुरविण्यात आले. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील आदी सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आण्याच्या मोहिमेचा शुभारंभ सप्टेंबर महिन्यात भोर तालुक्यात करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नियोजनद्ध कामकाज करुन पोटखराबाचे ६० हजार एकर क्षेत्र लागवडयोग्य केले आहे. तालुक्यातील आज ६ हजार एकर क्षेत्रावरील पोटखराबाचे शेरे कमी करुन सातबारे वाटप करण्यात आले. या मोहिमेत भोर प्रशासनाने चांगले काम केले आहे.
‘जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासांची’ या अभियानाच्या अनुषंगाने भोर प्रशासनाने पुढील दोन महिन्यात तालुक्यातील प्रत्येक घरात शासनांच्या प्रत्येक विभागाच्या योजना पोहचवून लाभ देण्याचे नियोजन केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेशप्रकियेच्या वेळी होणारी अडचण कमी करण्याच्यादृष्टीने उन्हाळी सुट्यामध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून त्यांचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जातीचा दाखला, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी दाखल्याचे वाटप या कार्यक्रमात करण्यात आले.
पाणंद रस्ता केला खुला..जिल्हाधिकाऱ्यांची बैलगाडीतून मिरवणूक
येवली गावातील नागरिक आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने मागील ५० वर्षापासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल गावकऱ्यांनी बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची मिरवणूक काढली. लोकसहभागातून अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरु असून याचा परिसरातील सुमारे ४३५ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच ३७५ एकर शेतजमीन विकसित होण्यास मदत होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री. कचरे यांनी दिली आहे.