पुणे

केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी घेतला ओबीसींसाठीच्या योजनांचा आढावा

पुणे, दि. 18: केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ओबीसी प्रवर्गाच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, सदस्य सचिव वासुदेव पाटील, संशोधन अधिकारी मेघराज भाते, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखर पुणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आणि इतर महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत अध्यक्ष श्री. अहिर यांनी ओबीसी प्रवर्गाच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सद्यस्थितीत कार्यवाहीच्या अधीन असणाऱ्या प्रकरणांबाबतही माहिती घेतली. ओबीसी घटकांच्या सर्व वसतिगृहांच्या बाबतचे मूलभूत प्रश्न व सोयीसुविधा यांच्यावर करावयाच्या उपायोजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व अन्य महामंडळाच्या योजनांचे कार्यान्वयन यथाशीग्र व जलदगतीने करण्यात यावे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी प्रवर्गासाठीच्या राखीव जागा भरल्या जातात किंवा कसे याबाबतची माहिती केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे तात्काळ सादर करावी असे निर्देशही श्री. अहिर यांनी दिले.