पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : ऐन सणासुदीची संधी साधून समाजातील काही समाजकंटक आपल्या कारवाया करत असतात.असाच एक चालू असलेला कटाचा डाव पुणे ग्रामीण पोलिसांच्या `एलसीबी`ने (स्थानिक गुन्हे शाखा) सोमवारी उधळून लावला. त्यामुळे ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर येऊ घातलेले विघ्न टाळण्यात पोलिसांना यश आले असल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला. त्यांनी मुळशी तालुक्यातील वातुंडे गावामधून चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
मुळशी तालुका हा मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे अतिशय गाजला होता. आणि त्यातल्या त्यात हिंजवडी IT पार्क आणि मुळशी पॅटर्न ची चर्चा तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशात झाली होती. कारण बाहेरील राज्यातून( मध्यप्रदेशातून ) पिस्तूलांची स्मगलिंग होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सोमवारी पकडलेला हा शस्त्रसाठा सुद्धा बाहेरील राज्यातूनच आल्याचे समजते. मात्र, तो देणारा न सापडल्याने या शक्यतेला लगेच दुजोरा मिळू शकला नाही.
पुणे एलसीबी आणि स्थानिक पौड पोलीस स्टेशन मिळून या तिसऱ्या फरारी आरोपीचा कसून शोध घेत आहेत ,असे कारवाई केलेले पुणे `एलसीबी`चे पीआय अविनाश शिळीमकर यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितले. सदरील अवैध शस्त्र साठ्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती त्यांनी सांगितले.
सागर मल्लेश व्हंदमुळे (वय वर्ष 25,वातुंडे) आणि निलेश अशोक चौगुले (वय वर्ष २६,रा.सूसगाव) या दोघांना अवैध्य शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चौगुले हा हॉटेलमालक,तर व्हंदमुळे हा त्याचा कामगार आहे. हा शस्त्रसाठा घेऊन वातुंडे बस स्टॉपजवळ येणार असल्याची खबर एलसीबीतील पोलीस नाईक तुषार भोईटे यांना मिळाली होती. त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठ्यांना कळवली. त्यानुसार एलसीबीचे PI शिळीमकर,API नेताजी गांधारे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.त्यावेळी त्यांच्याकडे 2 लाख 14 हजाराचा शस्त्रसाठा सापडला.ही कारवाई केल्याबद्दल वातुंडे ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले. पौड पोलिस ठाण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून PI मनोज यादव पुढील तपास करत आहेत.
निलेश चौगुले हा स्थानिक असल्यामुळे त्याची शेतीवाडी असल्याने गुंठामंत्र्यांच्या थाटात राहत होता. सामाजिक कार्यकर्ता तथा नेता म्हणून तो मिरवत होता. त्यामुळे त्याच्या भोवती तरुणांचा घोळका नेहमीच असायचा. या कारणास्तव दहीहंडी उत्सवात आणि फ्लेक्स लावण्यावरून प्रतिस्पर्ध्यांकडून त्याला धमकी आली होती. अशी माहिती त्याने पोलिसांना दिली याप्रकरणातून बचाव करण्यासाठी त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध शस्त्रसाठा मागवला होता असेही त्याने पोलिसांना सांगितले.तसेच त्यातील काही पिस्टल तो आपल्या पोरांनाही देणार होता,असे पोलीस तपासात समजले आहे.