पुणे

“हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे सय्यद भाई म्हणजे धार्मिक सलोखा जपणारे व्यक्तिमत्व…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
माणूस म्हणून प्रत्येकाच्या जाती-धर्माचा आणि सरळ भावनांचा आदर केला पाहिजे त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण सामाजिक सलोखा राखू शकतो असे सांगत गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासून गणेशोत्सव व मोहरम सारख्या सणांच्या माध्यमातून हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचे काम हडपसर येथील सेवा दल कार्यकर्ते अब्दुल सय्यद आपल्या कृतीतून करीत आहेत.

71 वर्षे सय्यद भाई हे एक छायाचित्रकार चित्रकार व मूर्तिकारही आहेत त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी हडपसर परिसरामध्ये गणपती बनवण्याचा पहिला कारखाना सुरू केला होता बनवलेल्या मूर्ती सेवाभावी संस्थांना ते मोफत देत सेवा दलाच्या संस्कारामुळे सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न आजही सुरू आहेत.
दरवर्षीच्या गणेशोत्सवातून त्यांचे हे काम अधिक स्पष्टपणे जाणवते,
सय्यद भाई दरवर्षी गणेशोत्सवाची जणू वाटच पाहत असतात अनेक मंडळांना ते राष्ट्रीय एकात्मतेचे देखावे सुचवतात सर्व जाती धर्म पंथ यांना एकत्रित बांधून ठेवणारी संकल्पना ते देखाव्यातून उभी करण्याचा प्रयत्न नेहमी करतात हडपसर सह पुणे शहरातील विविध मंडळाचे देखावे व सजावटीचे काम ते करीत आले आहेत प्रसिद्ध मूर्तिकार डी. एस. खटावकर यांचे ते शिष्य आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रात जपले जाणारे बारकावे त्यांनी जपले आहेत सय्यद भाईंनी गणपती मंडळांमध्ये केलेली सजावट हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून आजही चर्चिली जाते त्यांच्या या योगदानासाठी पुणे महापालिकेने गणपती मंडळ सजावट समितीवर परीक्षक म्हणून त्यांची निवड केली होती महापालिका व दगडूशेठ गणपती मंडळासह मानाच्या गणपती मंडळांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्यांनी गणेशोत्सवादरम्यान बँड पथक, वाघ्या मुरळी, भारुड, भजन, कीर्तन, लेझीम, झांज पथक, ढोल – ताशा या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेच्या माध्यमातून सन्मान करण्याची प्रथा सुरू केली.

कोरोनाच्या काळात गणपती मंडळांवर सजावटीचे निर्बंध आले असले तरी हडपसर भागातील गणपती मंडळांद्वारे विचारातून एकतेच्या सजावटीची बीजे पेरण्याचे काम ते करत आहेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबांवर ही हेच संस्कार त्यांनी केले आहेत.

“समाजातील प्रत्येकाने मानवता धर्माचे पालन केले पाहिजे सेवाभाव जपून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाली पाहिजे ही साने गुरुजींची शिकवण सेवादलाने आम्हाला शिकवली आहे ती समाजवादाची शिकवण सर्वांमध्ये रुजून माणसातील भेदाची दरी कमी करण्याचा प्रयत्न मी करीत आहे”
अब्दुल सय्यद
सेवादल – कार्यकर्ता