पुणेमहाराष्ट्र

बेरोजगार असणाऱ्या मुलाला लायसन्सबाबत विचारणा करणे बेतले जीवावर ; मुलाने आई आणि बहिणीच्या पोटात खुपसला चाकू…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील काळेपडळ येथे राहत असलेल्या एका बेरोजगार मुलाने त्याच्या आईच्या आणि बहिणीच्या पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका बेरोजगार मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स बाबत विचारणा करणे जिवावर बेतले आहे. रागाच्या भरात मुलाने आई आणि बहिणीच्या पोटात चाकू खूपसत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील काळेपडळ येथील बिनावत टाऊनशिप सोसायटीत ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

साजिद युसुफ पठाण (वय वर्ष २९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी जखमी बहीण रुबिना हिने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून साजिदला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद हा बेरोजगार आहे. तो कोणताच कामधंदा करत नाही. त्यामुळे घरात नेहमी वाद होत होता. त्याची बहीण आणि आई त्याला नेहमी कामावरून बोलत असे. शनिवारी संध्याकाळी आरोपी साजिद याच्या आईने त्याला ड्रायविंग लायसन्स बद्दल विचारणा केली. तसेच गाडी चालवण्यासंदर्भात सांगितले. याचा साजिदला राग आला.

त्याने रागाच्या भारत हातात चाकू घेत ‘तेरे को तो मै आज मार दुँगा’ असे म्हणत सुरवातीला बहिण रुबीना यांच्या पोटावर चाकूने वार केले. यात रुबिना या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून साजिदची आई आली. त्यांनी साजिदला समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आईवर देखील चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी रुबिना आणि त्यांच्या आईवर येथील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक अब्दागिरे करत आहेत.