पुणे

“खोतीदार-व्यावसायिकांकडून सोलापूर मांजरी उपबाजारासमोर रस्त्यावर शेतमालाची विक्री, आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा तीव्र आंदोलन – बाळासाहेब भिसे…

पार्किंग, पावतीचे पैसे वाचले, वेळेत माल मिळाल्याने व्यापारी समाधानी

पुणे ः

खोतीदार आणि व्यावसायिकांनी मांजरी उपबाजारामध्ये काल तीव्र आंदोलन केल्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांशिवाय कोणालाही येथे शेतमालाची विक्री करता येणार नाही, असा फलक बाजार लावल्याने खोतीदार आणि व्यावसायिकांनी चक्क सोलापूर रस्त्यावर वाहनातून शेतमाल विक्री सुरू केली. शेतमाल विक्री चांगल्या पद्धतीने झाली. खरेदीदारांचे पार्किंग आणि पावतीचे पैसे वाचले आणि लवकरच शेतमाल मिळाल्याने खोतीदार आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. योग्य पद्धतीने वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही. बाजार समिती योग्य निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यालगतच शेतमाल विक्री करणार, असे बाळासाहेब भिसे यांनी सांगितले.

बाळासाहेब भिसे म्हणाले की, मांजरी उपबाजारमध्ये बुधवारी (दि. 4 ऑक्टोबर) आंदोलन केल्यानंतर चर्चेसाठी सभापतींच्या कार्यालयामध्ये बोलावले. त्यांच्या भेटीसाठी साहेबराव झांबरे, शिवाजी सूर्यवंशी, प्रेम आटोळे, पवन धुमाळ, राजू डांगमाळी, साई चंद, अशोक मुळीक, अजय लेंडे, गणेश कामठे, स्वप्नील भानवसे, सौरव ताम्हाणे यांच्यासह आम्ही दोन तास वाट पाहिली. मात्र, त्यांची भेट झाली नाही त्यामुळे खोतीदार आणि व्यावसायिकांसाठी कोणताही निर्णय झाला नाही. मांजरी उपबाजारमध्ये खोतीदारांना प्रवेश न दिल्याने खोतीदार- व्यावसायिकांनी सोलापूर रस्त्यावरलगत वाहने थांबवून शेतमाल विक्री सुरू केली. जोपर्यंत बाजार समिती निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यालगत शेतमाल विक्री करू, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मांजरी उपबाजारप्रमुख कल्याणराव कोतवाल म्हणाले की, खोतीदारांची गर्दी कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल लावण्यासाठी जागा मिळाली. तसेच, शेतमालाला बाजार चांगला मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे दिसून आले. खोतीदार-व्यावसायिकांविषयी निर्णय झाला नाही, त्यामुळे त्यांची वाहने बाजार आवारात येऊ दिली नाहीत. बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच वाहने अडविली.