महाराष्ट्रमुंबई

रुग्णवाहिका टेंडरप्रकरणी आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भूमिका संशयास्पद टेंडरची निविदा रद्द करून चौकशी करावी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

मुंबई – राज्य सरकारने १०८ रुग्णवाहिकाच्या सेवेसाठी नव्याने काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठया प्रमाणात घोटाळा झाला असून या टेंडरप्रकरणी आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या टेंडरची निविदा रद्द करून निःपक्षपातीपणे याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असलेल्या १०८ रुग्णवाहिका पुरविण्यासाठी यंदा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून नव्या ठेकेदाराला दर महा ७४ कोटी २९ लाख रुपये देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. नव्या ठेकेदाराला वर्षाला ९०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. शासन अशाप्रकारे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे संवर्धन करण्याच्या नावाखाली जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करत असल्याची टीका दानवे यांनी केली.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार टेंडरसाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन कामाचा दर्जा वाढविण्यासाठी २१ दिवसांची कालावधी असताना सुमारे ८ हजार कोटीपर्यंतच्या टेंडरसाठी २१ दिवसांचा अवधी अपेक्षित असताना केवळ सात दिवसांत टेंडर उघडून सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले.

 

अशाप्रकारे नियमबाह्य कामकाजाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त, संचालक व सचिव हे खतपाणी घालण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
नियमबाह्य व मुदतीपूर्व टेंडरप्रक्रिया राबविल्यामुळे यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते त्यामुळे याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी दानवे यांनी लावून धरली आहे.