पुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र आरोग्य मंडळास सिकलसेल औषधाचे पेटंट मंजूर

सिकलसेल ॲनिमिया हा आजार रक्तातील अनुवंशिक घटकामुळे उद्भवणारा जनुकीय आजार आहे. या रोगावर गरिबांना परवडेल असा कोणताही उपाय विकसित झालेला नाही. भारतातील बहुतांश आदिवासी भागात या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. तसेच परदेशातही या रोगाचे रुग्ण आढळून येतात. महाराष्ट्रात किंबहुना भारतात सिकलसेल ॲनिमियावर १९९८ पासून काम करणारी महाराष्ट्र आरोग्य मंडळ ही एक अग्रगण्य संस्था आहे. दर दोन महिन्यांनी संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यात धडगाव येथे मोफत शिबिरे आयोजित केली जातात. आज धडगाव परिसरासह महाराष्ट्रातील इतर भाग गुजरात, मध्य प्रदेश सीमेवरील अनेक आदिवासी रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात. प्रत्येक शिबिरात अनेक नवे रुग्ण आढळून येतात.

 

संस्थेने कै .डॉ. सि. तु. (दादा) गुजर व कै. वैद्य य. गो. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद शास्त्रातील वनस्पतींपासून औषध तयार केले आहे. या औषधाने रुग्णांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून त्यांचा त्रास कमी करण्यात संस्थेला यश आले आहे.
महाराष्ट्र आरोग्य मंडळ व सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद सिद्ध (CCRAS) यांच्यावतीने सिकल सेल आजारावरील बनविलेल्या या औषधाचे पेटंट मिळण्यासाठी २०१३ मध्ये भारत सरकारकडे अर्ज सादर केला होता. या पेटंटला भारत सरकारकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. या कामी पद्मश्री डॉ. सु. ल. काटे, सुमतीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालयातील संबंधित सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी, लॅब तंत्रज्ञ, फार्मसी विभागाचे डॉ. भातांब्रे व कर्मचारी तसेच प्राचार्य डॉ. प्रणिता जोशी देशमुख आणि साने गुरुजी आरोग्य केंद्राचे सहकारी यांची मदत झाली आहे.