पुणे (प्रतिनिधी )
लाखो, करोडो रुपये खर्चून फ्लॅट घेतले, महापालिकेला टॅक्स भरतो प्रशासनाच्या आडमुट्या भूमिकेमुळे वारंवार रस्ते, ड्रेनेज लाईन व जलवाहिनीसाठी खोदले जातात नगरसेवक माजी झाल्याने लक्ष देत नाहीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत आमचे प्रश्न सोडविणार कोण असा टाहो फोडत हडपसरच्या भोसलेनगर सोसाट्यांमधील उच्चशिक्षित वर्गाने आक्रमक तक्रारी मांडल्या, भविष्यात नागरी प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला, माजी उपमहापौरांना देखील सोसायटीच्या सदस्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.
हेमंत ढमढेरे, अशोक राऊत, ऍड.के. टी. आरु सुनील फुलपागार यांच्या पुढाकारातून भोसलेनगर सोसायटी परिसरातील नागरिकांची बैठक भोसले गार्डन मध्ये आयोजित करण्यात आली होती, मोठ्या संख्येने परिसरातील उच्चशिक्षित वर्गातील नागरिक व महिला यावेळी सहभागी झाले होते.
हेमंत ढमढेरे, अशोक राऊत, ऍड.के.टी आरु, माऊली तुपे, प्रवीण शेवकर यांनी या भागातील समस्या मांडल्या.
अचानक या बैठकीस माजी उपमहापौर निलेश मगर दाखल झाले, नागरिकांनी त्यांना देखील येथील प्रश्नांवर जाब विचारला बजेट मिळत नाही असे त्यांनी सांगताच जोपर्यंत प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही रस्ते खोदू देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला.
चांगले रस्ते असतानाही पुणे मनपा, पाणी विभाग आणि महापारेषण याच्यातील समन्वय नसल्याने चांगल्या रस्त्याचे वाटोळे केले आहे याबाबत हडपसर भोसले नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी एकत्र येऊन पुणे मनपाच्या कारभारा विरोधात निषेध व्यक्त केला या गलथान कारभारात सुधारणा झाली नाही तर मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा हेमंत ढमढेरे यांनी यावेळी दिला.
महापालिकेत प्रशासकराज असल्याने सर्व नगरसेवक माजी झाले आहेत, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत त्यामुळे येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत निवडणूक आली की मग जाब विचारणार असा नाराजीचा सुर माऊली तुपे यांनी व्यक्त केला. नागरी प्रश्नावर जनता आता संतप्त झाल्याचे चित्र हडपसर विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.