मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत उपाययोजना न झाल्याने मांजरी ग्रामस्थांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक प्रवीण रणदिवे यांच्यासह युवासेना उपविभागअधिकारी राहुल खलसे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शेख , सुमित राखपसरे यांनी पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमी मध्ये अनेक असुविधा असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात त्या ठिकाणचे बीडाचे चौथरे वारंवार चोरीला जात आहेत, त्यामुळे लाकडे व गोवऱ्या रचने अवघड झालेले आहे.
जवळपास एक ते दीड लाख लोकसंख्या असलेल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील मांजरी गावच्या स्मशानभूमीसाठी तातडीने तीन शिफ्ट मध्ये रखवालदार नेमण्याची आवश्यकता आहे. याकडे रणदिवे यांनी लक्ष वेधले आहे.
अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीसाठी येथे बराच वेळा पाण्याची ही व्यवस्था नसते. रात्री अपरात्री प्रकाश व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी सौर उर्जेवर चालणारे दिवे या ठिकाणी बसविण्याची आवश्यकता आहे.
येथील परिसरात स्वच्छतेचाही अभाव असून मोकाट कुत्री घाण करत असतात.
दैनंदिन स्वच्छता होईल असे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय स्मशानभूमी परिसरात उभारण्याची गरज आहे.तसेच सावडल्यानंतरची राख ड्रेनेज लाईन मधून नदीकडे सोडली जाते तीही बऱ्याच वेळा तुंबलेली असल्याने ती प्रवाहीत व्हावी यासाठी योग्य ते उपाय योजना करणे गरजेचे आहे. मयत पास देण्याची व्यवस्था ही होणे गरजेचे आहे .आदी मागण्यांसंदर्भात तातडीने दखल घेऊन एक अत्यावश्यक व विशेष बाब म्हणून आवश्यक तो प्रस्ताव निधीसह तात्काळ मंजूर करण्यात यावा. अशी मागणीही प्रवीण रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.