पुणे

“रणसंग्राम शिरूर लोकसभा…. “शिवसेनेचा पठ्ठ्या आता अजित दादाच्या पक्षात? “खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार?

पुणे (अनिल मोरे )
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित मतदार संघ शिरूर लोकसभा मानला जातो या मतदारसंघातून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगलेली असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविणारच वेळप्रसंगी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा पठ्ठा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घड्याळ चिन्हावर कुस्ती मारण्याच्या तयारीत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात तसा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ आधीचा खेड व नंतरचा नव्याने अस्तित्वात आलेला शिरूर असे तीन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आढळराव पाटलांनी शिवसेनेची चांगली बांधणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात केली आहे, भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता परंतु अचानक अजित पवार सत्तेत सामील झाल्याने या मतदारसंघासाठी अजित पवार आग्रही आहेत, सुरुवातीला चिरंजीव पार्थ पवार, विलास लांडे यांची चर्चा होती तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये गेलेले प्रदीप कंद हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असा कयास बांधला जात होता, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घराघरात पोहोचवणारे संसद रत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमोल कोल्हे यांची खासदारकीची पाच वर्षाची कारकीर्द अतिशय वादळी ठरली, संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे व आपल्या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, अभ्यासू खासदार म्हणून त्यांची दखल देशपातळीवर घेतले गेली, त्यामुळे त्यांना सक्षम विरोधी उमेदवार फक्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच आहेत, शहरी भागाबरोबर गावागावात व वाड्या वस्त्यांवर आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे त्यातच सहा विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार, भाजपचा एक आमदार आणि अजित पवार यांना मानणारा वर्ग पाहता त्यांचे पारडे जड होईल असे मानले जाते परंतु खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहता दोघांमध्ये लढत मात्र तुल्यबळ असणार आहे,

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येचा माळी समाज व छत्रपती संभाजी मालिकेमुळे महिलांचा अमोल कोल्हे यांना पाठिंबा आहे, गेल्या काही दिवसापासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणांमधून अभिनेता म्हणून हिणवले व पाच वर्षात एकही रुपयाचे काम मतदारसंघात झाले नाही फक्त पोकळ भाषणे झाली अशा टीका केल्या. या टीकेला खासदार कोल्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत मतदारसंघात आणलेले प्रकल्प जाहीर भाषणांमधून मांडले आहेत, आढळराव पाटलांना आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध केला असला तरी अजित दादांच्या शब्दापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पानही हालत नाही, त्यामुळे हा विरोध पेल्यातील वादळ ठरेल. या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांना डावलून आढळराव पाटील यांना उमेदवारी दिल्यास वळसे पाटील काय भूमिका घेतात हे पण पाहणे महत्त्वाचे ठरेल, एकंदरीत आमदारांची संख्या व अजितदादांनी जाहीर भाषणात दिलेले आव्हान पाहता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवार मानले जातात परंतु ऐनवेळी शरद पवार काय डाव टाकतात अन त्यांचा निष्ठावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेवर निवडून आणण्यासाठी काय खेळी खेळली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिरूर लोकसभा लढविणारच…..
यासंदर्भात म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप महायुतीचे जागावाटप झालेले नाही मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली यामध्ये त्यांचा आग्रह आहे लोकसभा निवडणूक लढवायचीच त्यामुळे जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला घड्याळाचा चिन्हावर सुद्धा लढवण्याची माझी तयारी आहे काही करून लोकसभा निवडणूक लढविणारच. असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रोखठोक महाराष्ट्र न्युजशी बोलताना ठामपणे सांगितले.