पुणे

“पुण्याच्या राजकारणात भूकंप… “मनसेचे वसंत मोरे यांचा सर्व पदांचा राजीनामा – राज ठाकरे यांना मोठा धक्का”

पुणे (विशेष प्रतिनिधी)
राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे, मनसे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी पक्ष सोडल्याची माहिती दिली आहे. लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळून वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे.

 

तीन वेळा नगरसेवक पद भूषविलेले वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढविली होती, पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यावर त्यांनी पुण्यात कामाचा धडाका लावला होता, त्यानंतर पक्षातील काही असंतुष्ट नेत्यांनी राज ठाकरे यांचे कान भरले अन त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले, त्यांच्यावर राज्य सरचिटणीस जबाबदारी दिली वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती म्हणून त्यांनी पुण्यात जनता दरबार जोरात सुरु केला होता, चर्चेतील लोकसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते पण जुन्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारस्थानला कंटाळून त्यांनी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

 

काय म्हणालेत वसंत मोरे पोस्टमध्ये?

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.

परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षातर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्व सर्व पदांचा राजीनामा देत आहे.