प्रतिनिधि- स्वप्निल कदम
थेऊर, पूर्व हवेलीत महसूल खात्यातील थेऊरच्या भ्रष्ट व लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना व त्यांच्या खाजगी दोन इसमांना ७ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे हवेली महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे व त्यांचे खाजगी इसम योगेश कांताराम तातळे (वय २२, खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाबु कदम चाळ, दिघी) व विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८ वर्ष, व्यवसाय एजंट, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली
होती.
थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्वीकारण्यासाठी खाजगी ‘शूटर’ ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती. मात्र त्यांच्यासह खाजगी शूटरलाच
कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांचे नावे मौजे कोलवडी, येथे असलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उता- यावरील नाव कमी झाल्याचे दिसुन आल्याने, त्या नावाची नोंद पुर्नस्थापीत करण्यासाठी तक्रारदार यांची आजी व तिच्या बहिणींनी हवेली तहसिलदार यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. सदर अर्जावर तहसिलदार यांनी, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडिलांच्या नावाची ७/१२ उता-यावर नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी थेऊर यांना आदेश दिले होते.
याबाबत गावकामगार तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे ती नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी थेऊर कार्यालय येथे लोकसेविका जयश्री कवडे यांना भेटले असता, लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी इसम विजय नाईकनवरे यास भेटण्यास सांगितले. त्यानंतर विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंदीप्रमाणे आजीच्या आईच्या वडीलांची नोंद मंजुर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्याकरीता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, थेऊर मंडल अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. व खाजगी इसम विजय नाईकनवरे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तर लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी नाईकनवरे याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले. म्हणुन खाजगी इसम तातले व नाईकनवरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जयश्री कवडे व त्यांचे दोन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.