साधनसुचीतेचा, इमानदारीचा खोटा आव आणणाऱ्या मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांसमोर फाडला.
कॉर्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी तसेच सरकारी कंत्राट देण्यासाठी राजकीय देणगीच्या स्वरूपात लाच घेण्यासाठी या इलेक्टोरल बॉण्ड्सचा कसा वापर करण्यात आला याचं सविस्तर सादरीकरण प्रशांत जगताप यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून केलं.
राजकीय देणगी देणाऱ्या अनेक कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती. कोणत्या कंपनीवर कधी कारवाई झाली आणि या कारवाईतून मुक्त होण्यासाठी या कंपन्यांनी कशी देणगी दिली याची इत्यंभूत माहिती यावेळी समोर मांडण्यात आली. राजकीय देणगी देणाऱ्या एका कंपनीला बिहारमधील एका पुलाचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीने बांधलेला पुल काही दिवसातच जमीनदोस्त झाला, यात मोठी मनुष्यहानी झाली. तरीही इलेक्टोरल बॉण्ड्स दिल्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही. जुगाराच्या माध्यमातून देशातील कित्येक कुटुंबे उध्वस्त करणाऱ्या गेमिंग कंपनीकडून देणगी स्वीकारताना सरकारची साधनसुचिता कुठे गेली ? कोविडच्या काळात गरीब रुग्णांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या हॉस्पिटलकडून देणगी स्वीकारताना नैतिकता कुठे गेली ? असा संतप्त सवाल प्रशांत जगताप यांनी केला.
अनेक कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचे सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून कशी लाच दिली याचीही सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीने इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून अमाप माया जमवली आहे. याच पैशाच्या जोरावर ते इतर पक्षांमध्ये फूट पाडून, त्यांचे आमदार, खासदार विकत घेऊन लोकशाहीला एकप्रकारे पैशाच्या जोरावर जमीनदोस्त करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे
– प्रशांत जगताप