पुणे

घड्याळाला मत…नरेंद्र मोदींजींना मत, घड्याळाला मत हे देशाच्या विकासाला मत – पुण्यात पंतप्रधानांच्या सभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास 

पुणे-
घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत,घड्याळाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत..असे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेसकोर्स येथील सभेत बोलताना केले.
श्री.आढळराव पुढे म्हणाले की,लोकसभेची ही निवडणूक देशासाठी प्रतिष्ठेची आहे,शेतकऱ्यांचं धोरण,परराष्ट्र धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे.गेल्या १० वर्षात मोदींनी केलेलं कामे विचारात घेऊनच मतदान करायचं आहे.केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं असल्याची कांगावा केला जातो.पण गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने १२ कोटी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये प्रत्येकी असे ७२ हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला आणि पाच वर्षात ३ लाख ६० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.खर्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी मोलाचा हातभार केंद्रसरकारने लावला.

 

त्यांनी पुढे सांगितले की,केंद्राने १ लाख टन कांदा निर्यातीला जी परवानगी दिली,ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.तर दुधाला पाच रुपये लिटर अनुदान हे राज्य सरकारने दिलं,प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून ही योजना राज्यात लागू केली.त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आवाहन…
आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले,शिरुर लोकसभेतील महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणे.तसेच तळेगाव,चाकण,शिक्रापूर आणि पुणे नगर महामार्गावरील ट्राफीक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती आढळऱाव पाटील यांनी केली..