चाकण – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी शुक्रवारी (दि. १० रोजी) जेष्ठ नेते चाकणला जाहीर सभा घेणार आहेत. बारामती मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार शिरूर मतदार संघात सक्रिय झालेत.
चाकणच्या मार्केटयार्ड आवारात संध्याकाळी साडेचार वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते भाऊसाहेब थोरात, ओमराजे निंबाळकर, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची ही चौथी सभा आहे.
लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यापासून डॉ. कोल्हे सातत्याने आपल्या निवडणूक प्रचारात मतदार संघातील प्रश्नांबाबत , पॉलिसी मेकिंग च्या संदर्भात मुद्दे मांडत आहेत. एकीकडे डॉ. कोल्हे हे धोरणांवरती, मतदार संघात येऊ घातलेल्या प्रकल्पांविषयी बोलत असताना विरोधकांकडून मात्र, सातत्याने त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे.
असं असलं तरी डॉ. कोल्हे हे केवळ मुद्द्यांवरतीच बोलत आहेत. ओतूर आणि शिरुर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत डॉ. कोल्हे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 15 वर्षाच्या खासदारकीच्या कामकाजाचा बुरखा फाडला होता. आढळराव पाटील हे स्वतःच्या कंपनीला फायदेशीर ठरतील अशा पद्धतीने संसदेत केवळ संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत असल्याचा आरोप डॉ.कोल्हे यांनी केला होता. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी याबाबत पुरावा देणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. आता या जाहीर सभेत आढळराव पाटलांविषयी डॉ. कोल्हे आणखी कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. आढळराव पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांचा लेखाजोखाच डॉक्टर कोल्हे यांनी आपल्या व्हिडिओतून जनतेसमोर मांडला. त्यामुळे शिरूरमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत कोल्हे आणखीन कोणते मोठे गौप्य स्फोट करणार यावर कोल्हे समर्थकांसह आढळराव पाटील यांच्या समर्थकांचेही लक्ष लागलेले आहे.त्यामुळेच शिरूर मध्ये होणारी शरद पवारांची सभा ही महत्त्वाची ठरणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा शिरूर मतदारसंघात सक्रिय झालेत. डॉ.कोल्हे यांनी वैयक्तिक पातळीवर टीका करणाऱ्या अजित पवारांनाही थेट लक्ष केलं आहे. आता चाकणच्या सभेत कोल्हे अजित पवारांवर ती काय बोलणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे.