पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या भीषण अपघात अपघातातील पोर्शे कार आणि त्या कारचा चालक हा अल्पवयीन (वय १७) वर्षांचा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघात प्रकरणात १७ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर झाला होता. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायीकाचा मुलगा ही अलिशान कार चालवत होता. या अपघाताचा व्हिडीओही आता समोर आला आहे.
१७ वर्षीय मुलाला न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला. तसेच अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश दिले होते. यानंतर आता या अपघाताची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेसंदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून घेतली, तसेच तात्काळ कारावाईचे आदेश दिले आहेत.
याबरोबरच या अपघातातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलिस आयुक्तांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. याबरोबरच या प्रकरणातील आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
पोलिसांनी काय म्हटलं होतं? व्यावसायिकाचा मुलगा दारुच्या नशेत चालवत होता कार
सदर मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्याला जामीनही मिळाला होता. पुणे शहर पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालं ती कलमंही लावण्यात आली. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिलं त्यांच्याविरोधात कलम ७५ आणि ७७ अंतर्गत कारवाई केली जाईल. असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
न्यायालयाने दिले निबंध लिहिण्याचे आदेश
न्यायालयाने अल्पवयीन मुलाला जामीन देताना कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं आहे. पोर्शेने दुचाकीला टक्कर दिली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्यानं ३०० शब्दाचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल, अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत, असं सांगितलं. तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली होती.