राज्यातील ‘बहुचर्चित’ झालेल्या शिरूर लोकसभा निवडणुकीत लढत अतिशय अटीतटीची झाली होती या निवडणुकीत शरद पवारांचे शिलेदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली असून अजित पवार यांच्या पक्षात नव्याने प्रवेश केलेले शिवाजी आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तब्बल एक लाख चाळीस हजार मतांनी डॉ. कोल्हे यांनी निवडणूक एकतर्फी जिंकली.
पुण्यातल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाची यावेळी राज्यभर चर्चा झाली. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांच्यात थेट लढत झाली. आढळराव पाटलांनी हायटेक प्रचार आणि अमोल कोल्हेंच्या गावोगाव भेटी अन् भाषणं गाजले होते. शिरुरमध्ये यावेळी साधारण ५४ टक्के मतदान झाले होते.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांचा पराभव झालेला आहे.
शिरुर मतदारसंघात राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. सुरुवातीला अजित पवारांसोबत गेलेल्या कोल्हेंनी पुन्हा शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं होतं. तर आढळराव पाटलांनी शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडून तिकिट घेतलं होतं. परंतु शेवटी कोल्हेच विजयी ठरले आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय?
पुण्यातील शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड-आळंदी या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.
आंबेगावमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आमदार आहेत, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. भोसरीमधून भाजपचे एकमेव आमदार महेश लांडगे हे आहेत. हडपसरमधून चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते हे आमदार आहेत तर शिरुरमध्येही राष्ट्रवादीचेच अशोक पवार हे आमदार आहेत.
हडपसर मतदारसंघात दुसऱ्या फळीने लढवीला किल्ला…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर विद्यमान आमदारांसह अनेक माजी नगरसेवक गेले, त्यातच त्यांना भाजप व शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह दुसऱ्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खिंड लढवली आणि विजय खेचून आणला.