पुणे

पुण्याच्या हिंजवडी आयटी परिसरातील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा हिंजवडी परिसरात उद्योगसुलभ वातावरणासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान परिसरातील वाहतूक कोंडी
दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपुलांची कामे हाती घ्या
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १९ :- पुण्यातील जागतिक दर्जाचे आयटी हब अशी ओळख असणाऱ्या ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासह या परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. या परिसरातील उद्योग, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सोयीच्या दृष्टीने परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेतली. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल महिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त सुनील रामानंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. कदम, हिंजवडी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन योगेश जोशी, सचिव कर्नल चरणजित भोगल आदी मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, हिंजवडी, माण, मारुंजी गावच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर त्याची आयटी हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील कंपन्यांना उद्योग सुलभ वातावरण देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पीसीएमसी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आदी शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे समन्वयाने आणि तातडीने निराकरण करावे.

पुण्याच्या विविध भागांतून उद्योग, नोकरीनिमित्त हिंजवडी आयटी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत याठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करावेत, सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, सेवारस्त्यांची रुंदी वाढवावी, उड्डाणपुलांच्या ठिकाणी असलेल्या केबल्ससाठी भूमिगत व्यवस्था उभारावी. अनधिकृत केबल्स काढून टाकाव्यात. रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकून या परिसराचे सौंदर्यीकरण पूर्ववत करण्यात यावे. रस्त्यांवरील खड्डे भरावेत, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामेही तात्काळ मार्गी लावावीत. एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरासह पीएमआरडीएच्या हद्दीतील ग्रामपंचायत परिसरातून निर्माण होणाऱ्या कचरा समस्येविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आपल्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी १० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारत आहे. मात्र, एमआयडीसी परिसरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करावी. एमआयडीसी हद्दीत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी उभारावी. यासाठी हिंजवडी औद्योगिक संघटनेने सहकार्य करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

 

मागील काही वर्षांचा विचार करता हिंजवडी आयटी परिसरात वाहनांची एव्हढी रहदारी नव्हती. या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या, तसेच परिसरात उभे राहणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसायामुळे या भागात रहिवाशी आणि वाहनांची संख्या वाढत आहे. हिंजवडी परिसराचा वेगाने विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीने उभारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शुक्रवारी आणि शनिवारी या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.