Uncategorizedपुणे

पुणे म्हाडाच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून दि. २३ जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे .
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले कि, पुणे म्हाडाचा कार्यभार सांभाळण्यासाठी व येथे काम करण्यास इच्छुक होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून ‘गरीबांसाठी हक्काच घर’ ही म्हाडाची संकल्पना अधिक वेगाने राबविणार आहे. याशिवाय म्हाडाच्या पुणे प्रादेशिक मंडळातील धोरणात्मक कामे हाती घेणे, कामकाजाचा आढावा घेणे, नवीन प्रकल्पांची उभारणी करणे, कामांची गुणवत्ता व दर्जा सुधारणे, जास्तीत जास्त नागरिकांना घरे निर्मितीचा लाभ मिळवून देणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आदि कामे गतिमान पद्धतीने राबविण्यावर माझा भर असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या नागरिकांना घर खरेदी साकारताना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या योजनाही कसोशीने राबविण्यात येतील असा विश्वास यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी खासदर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नियुक्तीमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील त्यांचे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून ठीकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे.