लांडेवाडी , ता. आंबेगाव येथील श्री भीमाशंकर बी.एड. कॉलेज येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १२ ऑगस्ट हा दिवस भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या जन्म दिनानिमित्त संपूर्ण भारतभर हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. श्री एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथ पूजन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. शामल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ग्रंथपाल प्रा. चंद्रकांत काटे यांनी एस.आर. रंगनाथन यांनी ग्रंथालयासंदर्भात सांगितलेल्या पंचसूत्रीबाबत मार्गदर्शन केले. तर प्रा.शामल चौधरी यांनी ग्रंथ हेच आपले मित्र आहेत. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी आपल्या शैक्षणिक संकुलात अतिशय उच्च दर्जाची लायब्ररी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. सर्व प्राध्यापक व विध्यार्थ्यानी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून ग्रंथसंपन्न व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री भीमाशंकर बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय चौधरी, डॉ.विश्वजित थिगळे, प्रा.सुनील गावशेते व सर्व स्टाफ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.चंद्रकांत काटे यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल प्रा.ज्योती भोजने यांनी मानले.