प्रतिनिधी स्वप्नील कदम
लोणी काळभोर (कदमवाक् वस्ती) येथील एका गरीब घरातील युवकाने उच्च शिक्षण घेतलेले असतानासुद्धा कुटुंबाचे आर्थिक गणित बिगडू नये म्हणून स्वत: लोणी काळभोर (स्टेशन, ता. हवेली) चौकात उभा राहून फळविक्री करणारा मुलगा अरबाज शहाजान पठाण हा राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे अरबाजचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो लवकरच पोलीस दलात रुजू होणार आहे.
सन २०२२ – २३ ची सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची परीक्षा २१ जुलै रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत अरबाज उत्तीर्ण झाला आहे. त्याची राज्य राखीव पोलीस दलासाठी निवड झाली आहे. अरबाजने कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
अरबाज पठाण यांचा वडिलोपार्जित फळे व भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. अरबाजचे आजोबा रशीद पठाण हे पहिल्यापासून हातगाडीवर फळे विक्री करीत आहेत. तर आजी सुनाबी या भाजीपाला विक्री करतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अरबाजचे वडील शहाजान व आई शहीनाज यांनी फळांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयातून अरबाजने प्राथमिक शिक्षण घेतले. तर माध्यमिक शिक्षण पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. तर हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पदवी घेतली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अरबाजने अभ्यासासोबत आई वडिलांसोबत फळेविक्री व्यवसायास मदत करण्यास सुरवात केली.
आपल्या घरची हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी आपणही शासकीय नोकरी मिळविली पाहिजे. या गरिबीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढले पाहिजे असे स्वप्न त्याने पाहिले होते. हे स्वप्न अरबाजला स्वस्थ बसू देत नव्हते. अरबाजने फळेविक्री बरोबर पोलीस भरतीची अभ्यास सुरु केला. अरबाजने २०२४ साली पोलीस भरतीची तयारी केली. अरबाजने जिद्द, मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. अरबाजने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.