पुणेमहाराष्ट्र

सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता गॅंगचा जीवघेणा हल्ला, पुणे पोलीस दलात खळबळ

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे : पुण्यात चाललंय तरी काय? आता तर कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे. ही घटना (दि. २५) रामटेकडी भागात दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८ वर्ष तुळजभवानी वसाहत हडपसर,)असं हल्ला केलेल्या आरोपीचे नावे आहे.

पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांनी दहशत माजवली होती. त्यांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

निहालसिंग टाक व दुसरा आरोपी राहुलसिंग रवींद्रसिंग भोंड (वय १९ वर्ष रा.हडपसर) हे दोघेही रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांनी या आधीही पोलिसांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार रामटेकडी भागामधे दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू होती. ही बातमी कळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड हे आरोपींना पकडण्यासाठी रामटेकडी भागात गेले होते. त्यावेळी दोन गटात हाणामारी चालु होती.सहायक पोलीस निरीक्षक त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्यावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेले गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात कोयता गँग सक्रिय…

आतातर कोयता गँगनी पोलिसांवरच हल्ला केल्या मुळे जनतेमधे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. याआधीही पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हेगारावर वचक बसावी म्हणून त्यांची शहरातून धिंडही काढली होती. पण आता कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.