पुणे : हडपसर परिसरात मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. ओंकार अंगद बिनवडे (वय २१, रा. प्रगतीनंगर, काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीकडून ६९ बाटल्यांसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण नसताना विना परवाना औषधविक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून टर्मीनच्या ३९ बाटल्या जप्त केल्या. टर्मीनचे इंजेक्शन दिल्यास शरीराला विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते. अटक केल्यानंतर आरोपीकडून आणखी ३० बाटल्या अशा एकूण ६९ बाटल्या जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेशकवळे, संदीप राठोड, जोतिबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, नीलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पुढील तपास करीत आहेत.