पुणे : हडपसरमधील रामोशी आळी येथे गुरुवारी (दि. १९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका ३९ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना १२ तासांत अटक केली असून, व्यसनाची माहिती आईला आणि पत्नीला दिल्याच्या रागातून त्याने आणि त्याच्या साथीदाराने खून केल्याची कबुली दिली.
अमोल मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर, पुणे) असे मृताचे नाव आहे. तर, वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसर) असे आरोपीचे नाव असून, ज्ञानेश्वर दत्तू सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) असे साथीदाराचे नाव आहे. या प्रकरणी मृताची बहीण संगीता कुलकर्णी यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, वैभव आणि अमोल हे मित्र होते. वैभव हा नशा करीत होता. त्यामुळे त्याचे आई व पत्नीसोबत सतत भांडण होत होते. अमोलने आपल्या व्यसनाची माहिती आई व पत्नीला दिल्याचा वैभवला संशय होता. यामुळे वैभव हा अमोलवर चिडून होता. त्यातून त्याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. वैभव याने आपला मित्र ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गुरुवारी रात्री अमोलच्या घरी गेला. अमोल एकटाच राहत असल्याने ते तिघे एकत्र भेटले. तेथे वैभवने आपल्या व्यसनाची माहिती कुटुंबीयांना का देतोस, यावरून अमोलसोबत वाद घातला. या दरम्यान, धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून दोघा आरोपींनी पळ काढला.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपास करीत वैभवला हिंगणे आळी येथून ताब्यात घेतले. तर, ज्ञानेश्वर हा सोलापूर येथे पळू्न गेला होता. त्याला तेथून ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतिबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे करीत आहेत.