हडपसर /पुणे (विशेष प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या यादी जाहीर करण्यात आली, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ३८ उमेदवारांची पहिल्या यादीत पुण्यातील जुन्नरमधून अतुल बेनके, बारामतीमधून अजित पवार, मावळमधून सुनील शेळके, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते, पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि हडपसरमधून चेतन तुपे या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हडपसरच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असल्याने मित्र पक्षात नाराजी पसरली आहे, उमेदवारीसाठी इच्छुक प्रमोद नाना भानगिरे काय भूमिका घेतात यावर विद्यमान आमदाराचे भवितव्य अवलंबून आहे. त्यातच अजित पवारांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकाने बंडखोरी केल्याने पुण्यात कारभाऱ्याची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्यामुळे अजित पवारांकडून तुपेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र हडपसर मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच तयारी केली होती. त्यातच भानगिरेंना उमेदवारी द्या, अशी मागणी करत हजारो कार्यकर्ते, नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पायी गेले होते.
आज हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी पसरली आहे. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे ठेवावा, यासाठी प्रमोद नाना भानगिरे हे आग्रही होते. मात्र आता हडपसरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे उद्या (गुरुवारी) बैठक घेत नाना भानगरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हडपसर मधून अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला व आता माघार नाही अशी घोषणा केली, पाच वर्षात विद्यमान आमदारांना भरीव कामगिरी करता आली नाही, त्यातच स्वकीयांकडून बंडखोरी आणि मित्र पक्ष शिवसेनेची नाराजी यामुळे महायुतीच्या आमदारांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरविणार – नाना भानगिरे
हडपसर मधून शिवसेनाला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली होती, कार्यकर्ते मुंबईत पायी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले, हडपसर मधून अजित पवार यांच्या पक्षाचे चेतन तुपे यांना उमेदवारी दिली, उद्या बैठक घेऊन पुढील भूमिका चर्चा करून ठरविणार.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख – शिवसेना (एकनाथ शिंदे )