पुणे

शिर्केवाडी – भावानगड रस्त्याचे उद्‍घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

संंगमेश्वर/ प्रतिनीधी : [ विलास गुरव] संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी भावानगड येथे भाविकांना पायीच प्रवास करावा लागत असे. भावानगड हे ऐतिहासिक ठिकाण असून तेथे भवानी आईचे पुरातन मंदिर आहे. मात्र खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांनी या समस्येकडे लक्ष वेधून रस्त्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आमदार शेखर निकम यांनी हा रस्ता क वर्ग पर्यटन योजनेंतर्गत मंजूर केला. यामुळे भावानगडवर जाणे अधिक सोयीचे होणार आहे आणि भवानी आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.

सदर रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्या हस्ते, ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात भावानगड परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमानंतर आमदार शेखर निकम यांनी भवानगड यात्रौत्सवात सहभागी होऊन भवानी आईचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला. यात्रोत्सवासाठी शुभेच्छा देताना त्यांनी भवानगडच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला आणि यात्रोत्सव हा लोकपरंपरांचा अभिमान असल्याचे सांगितले.

भवानगड परिसराचा विकास होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. रस्ता मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.

यावेळी माजी जि. प. सभापती राजन कापडी, र. जि. म. बँक संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच अस्मिता देवरुखकर, उपसरपंच अमित शिर्के, माजी सरपंच संतोष भडवलकर, मोहन ओकते, अविनाश गुरव, संतोष जाधव, रमेश शिर्के, महेश पुरी, प्रदीप शिर्के, सुमित्रा मांजरेकर, पोलीस पाटील विलास राऊत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य भाविक उपस्थित होते.