पुणे : प्रतिनिधी
हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल ४५ लाखांची बक्षिसे असून खुल्या विजेत्याला महिंद्रा थार गाडी, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.
पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धे विषयी माहिती दिली. शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत खुला गट हा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला असा असणार असून इतर गट पुणे शहर आणि जिल्हा अशा स्वरूपाचा असणार आहे. खुल्या गटातील पुरुष विजेत्याला महिंद्रा थार, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला १ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला १ लाख ५१ हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर खुल्यातील गटातील महिला विजेत्याला २ लाख ५१ हजार ई- बाईक आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्याला चषक आणि १ लाख ५१ हजार आणि तृतीय क्रमांक विजेत्याला चषक आणि १ लाख असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
तर कुमार गटातील कुस्ती स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यातील पैलवानांसाठी असणार आहे. त्यामधील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला चांदीची गदा आणि १ लाख, द्वितीय क्रमांक विजेत्याला ५० हजार आणि चषक आणि तृतीय क्रमांक विजेत्याला २५ हजार आणि चषक अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय कुमार गटातील वय वर्ष १७ आणि वय वर्ष १४ च्या खालील गटातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना सायकल आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.७ ) रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे हे उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर इराणचे मल्ल मिर्झा आणि आली यांचा प्रेक्षणीय सामना या स्पर्धे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर अनेक हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी उपस्थित राहणार असून या निमित्ताने त्यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी स. प. महाविद्यालयात मातीचे दोन स्वतंत्र आखाडे असणार असून जवळपास १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय होईल असे भव्य स्टेडियम उभारण्यात आले आहे. तसेच वाहनांच्या पार्किग साठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या पुरुष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी नामवंत खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे धीरज घाटे आणि पुनीत बालन यांनी सांगितले. पुणेकरांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून मातीतील कुस्तीचा थरार अनुभवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.