पुणे, दि. ७: जिल्ह्यात आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
‘आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरूपात राबविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबासाठी प्रत्येक सदस्याला आयुष्मान कार्डचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड बनविण्यासाठी अँड्रॉईड वर्जन आयुष्मान ॲप हे मोबाइल उपयोजक (अप्लिकेशन) तयार केले आहे. या मोबाइल ॲपद्वारे बेनिफिशरी लॉगिनमधून लाभार्थी व ऑपरेटर लॉगिनमधून सीएससी केंद्रचालक, ग्रामपंचायत ‘आपले सरकार सेवा केंद्र’चालक व आशा सेविका हे पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार ओटीपी किंवा चेहरा ओळखद्वारे (फेस ऑथेंटिकेशन) ई-कार्ड तयार करू शकतात.
पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी ५२ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले नाहीत. जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार प्रत्येक गाव तसेच शहरातील वार्ड मध्ये रास्त भाव दुकानदार, आशा स्वयंसेविका, सीएससी केंद्र चालक यांनी एकत्रित येऊन नियोजन करावे. प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने त्यांच्याकडे नोंद असलेल्या सर्व कुटुंबांच्या सदस्यांची यादी तयार करावी. यादी केल्यानंतर त्यातील आयुष्मान कार्ड असलेले कुटुंब व नसलेले कुटुंब यांचे वर्गीकरण करावे. रास्त भाव दुकानदाराने आयुष्यमान कार्ड काढले नसलेल्या लाभार्थ्यांना रेशन दुकानात बोलवावे, याची जबाबदारी दुकानदारावर राहील.
गावातील सर्व आशा स्वयंसेविका व सीएससी केंद्रचालक यांनी रास्त भाव दुकानात दिवसभर उपस्थित राहून आलेल्या सर्व लाभार्थ्यांची मोबाइल अँप्लिकेशन द्वारे ई-केवायसी करावी. सदर ई-केवायसी कार्ड काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी.
ई-केवायसी करण्याच्या कामाचा आढावा तालुका स्तरावर घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात गटविकास अधिकारी सहअध्यक्ष, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिव आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी सहसचिव असतील असेही नमूद करण्यात आले आहे. अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत उर्वरित आयुष्यमान कार्ड (ई-केवायसी) काढण्याची प्रक्रिया २५ दिवसात पूर्ण करावी, असेही निर्देश श्री. डूडी यांनी दिले आहेत.