पुणे,दि.१७:- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औेंध येथे आयोजित नवनियुक्त शिल्पनिदेशकांच्या प्रशिक्षणाचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी ५ हजार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे शासनाचे लक्ष्य असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अवर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, चाणक्य मंडळाचे डॉ. भूषण केळकर उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात २०१५ मध्ये कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी वर्ग आणि विविध संस्थेतील प्रशिक्षित प्रशिक्षकांनी ‘ट्रेन द टीचर्स’ उपक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा. हा उपक्रम यशस्वी झाल्यास १ लाख विद्यार्थी यशस्वी होतील. प्रशिक्षण देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. आयटीआयमधील शिक्षणाला अभियांत्रिकी शिक्षणाप्रमाणे महत्त्व प्राप्त होईल यासाठी संस्थांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी वर्ल्ड बँकेने १३०० कोटी रुपये दिले आहेत. केंद्र शासनाने राज्यातील १०० आयटीआय दत्तक घेतल्या आहेत. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयटीआयच्या बळकटीकरणासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी कौशल्य विकास विभागातर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश आहे. काही एनजीओंच्या सहकार्याने अनेक ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत. राज्यातील ४१९ आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे. जून २०२५ पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आयटीआय मध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे श्री. लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चित्रफितीच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश दाखवण्यात आला. मुख्यमंत्री या शुभेच्छा संदेशात म्हणाले, समाजाच्या विविध क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज भासते. तशीच ती गरज शिक्षकांनाही असते. ‘ट्रेन द ट्रेनर’ सारख्या संकल्पना म्हणूनच महत्त्वाच्या ठरतात. जेव्हा आपण ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे झेप घेण्याचे स्वप्न बाळगतो तेव्हा कुशल मनुष्यबळ हा त्यातील खूप मोठा आधार आहे. आणि कुशल मनुष्यबळ तयार करायचे असेल तर त्यांना प्रशिक्षण देणारे अधिक प्रशिक्षित असण्याची गरज आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ सुमारे १ हजार ३०० हून अधिक नवनियुक्त शिल्पनिदेशकांना होणार आहे. केवळ ज्ञान नाही तर वित्तीय व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी,व्यक्तीमत्व विकास इत्यादी बाबीही या प्रशिक्षणात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी संदेशाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातल्या तरुणांना चांगले प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यातल्या कौशल्याला चालना मिळावी, त्याचबरोबर उद्योग क्षेत्राला सुद्धा प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे या हेतूने राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली. राज्यातील उद्योगांना नवतंत्रज्ञान चालवणारे प्रशिक्षित, कुशल मनुष्यवळ देण्यासाठी राज्य शासनाने आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि त्यात काम करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी संदेशाद्वारे केले. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात येतील. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात भर तर पडेलच आणि हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.
युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. हे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी पहिलं पाऊल महाराष्ट्र शासनाने टाकलं आहे. या उपक्रमांतर्गत विद्यान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, ऊर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांसाठी महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि राज्यस्तरीय कौशल्य विकास उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन दिले जात आहे. तरूणांना जागतिक स्पर्धेसाठी सज्ज करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणे असे शासनाने लक्ष्य असून ‘ट्रेन द टीचर्स’ उपक्रम त्यादिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असेही श्री. पवार यांनी संदेशात म्हटले आहे.
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व इंडो-जर्मन टूल रुम, छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षणाचे आभासी पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात आय. टी. आय. मध्ये सीएसआर अंतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या नामांकित कंपन्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी या वेळी पुणे विभागाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, मुंबईचे सहसंचालक तथा माजी संचालक सतीश सुर्यवंशी, उपसंचालक सचिन धुमाळ, किशोर उबाळे, उदयकुमार सुर्यवंशी व पुणे विभागातील अधिकारी उपस्थित होते.