रत्नागिरी

आमदार शेखर निकम यांनी माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी

संगमेश्वर / प्रतिनीधी: (विलास गुरव) माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. माखजन बाजारपेठ येथे आमदार शेखर निकम यांनी भेट देवून ग्रामस्थांसोबत गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला प्रतिवर्षी येणाऱ्या पुरामुळे माखजन बाजारपेठ येथे पुराचे पाणी शिरते. गेली अनेक वर्षे नदी पात्रातील गाळ न काढल्याने पुराचे पाणी बाजरपेठेत शिरत असल्याने व्यापार्यांचे व ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. व्यापारी व ग्रामस्थ यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार निकम यांनी जिल्हा वार्षिक पूर नियंत्रण योजनेंतर्गत माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी निधी उपलबद्ध करून दिला.

नदी पात्रातील गाळ काढण्याच्या या कामाबाबत आमदार शेखर निकम यांनी संबंधीत अधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून काही सुचना केल्या. पुरामुळे बाजारपेठ, व्यापारी व ग्रामस्थ यांचे होणारे नुकसान व त्यावरील उपाययोजना लक्षात घेत नदी पात्रातील गाळ काढल्याने याचा काही प्रमाणात फायदा व्यापारी, ग्रामस्थ यांना होणार आहे.