पुणेरत्नागिरी

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – आमदार शेखर निकम

संगमेश्वर / प्रतिनीधी: (विलास गुरव) छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाला आणि बलिदानाला सलाम करत, संगमेश्वर येथे त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. आमदार शेखर निकम, मंत्री ना. नितेशजी राणे आणि महायुतीतील मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मारकाची घोषणा करण्यात आली.

या वेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या शौर्यगाथेचा जागर करत महायुतीच्या माध्यमातून संगमेश्वर येथे न भूतो न भविष्यती असे स्मारक उभारणार आहे. हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

मंत्री ना. नितेशजी राणे यांनी सांगितले की, “संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची हिंदवी स्वराज्यासाठीची लढाई हा इतिहासातील सुवर्णअध्याय आहे. या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा जागर देशभर होईल.”

यावेळी आमदार प्रसाद लाड, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जि. प्र. राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सारंग, माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, श्री. घोरपडे, वर्षा ढेकणे, पूजा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

“धर्मो रक्षती रक्षित:” या तत्त्वाने प्रेरित होत हिंदू धर्म रक्षण दिनाच्या निमित्ताने या स्मारकाची संकल्पना पुढे आली. हे स्मारक फक्त वास्तू नसून, भविष्यातील पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारे प्रेरणास्थळ ठरेल, असा दृढ विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.

संगमेश्वरच्या पवित्र भूमीत उभारले जाणारे हे स्मारक संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे स्थान ठरेल, अशी भावना यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.