मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा एक-एक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर फिरत असतानाच कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार, आताचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारात अजित पवार उतरले नव्हते. ते साधे इकडे फिरकलेही नाहीत. त्यावरून निकालानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर आगपाखड करीत, ते जाणीवपूर्वक प्रचाराला आले नसल्याचा ठपका ठेवला. मात्र, विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघात जाणार आहेत. तिथे करीत, भाषणही ठोकणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार हे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत.
त्यापलीकडे जाऊन राम शिंदेंचे स्व:पक्षातील राजकीय शत्रू आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हेही एकमेकांशेजारी बसणार आहेत. एरवी, राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहाणारे अजित पवार, राम शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील ही मंडळी एकाच वेळी, एकाच व्यासपिठावर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी पवार, शिंदें,विखे-पाटलांना एकत्र आणण्याचे नियोजन केले आहे. या तिघांना एकत्र आणून संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये आपली राजकीय ताकद दाखविण्याची खेळी करीत आहेत. अजित पवारांना बोलावून, त्यातही जंगी कार्यक्रम घेऊन, संध्या सोनवणे या कर्जत-जामखेडमध्ये कोणाला ‘टशन’ देणार, हे पाहाणे महत्त्वाचे राहणार आहे. काहीही असो, संध्या सोनवणेंनी केलेल्या या राजकीय खेळीने कर्जत-जामखेडचे राजकारण पुन्हा चर्चेत येणार आहे.
जामखेडमध्ये येत्या गुरुवारी (ता.१७ एप्रिल) रोज ‘शिव-फुले-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सव भरण्यात आला आहे. संध्या सोनवणेंच्या पुढाकारातून हा महोत्सव होत असल्याने अजित पवार हे आर्वजून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याजोडीला शिंदे, विखे-पाटलांचीही हजेरी राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसत आहेत. निवडणुकीनंतर आणि संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार हे जामखेडमध्ये येत आहेत. या महोत्सवात कुठची कसर राहणार नाही, याची काळजी घेत कार्यक्रमाचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, या महोत्सवात कुठचे कार्यक्रम आहेत, यापेक्षा महोत्सवात अजित पवार, राम शिंदे, विखे-पाटील एकत्र येऊन कोण, कोणावर काय बोलणार ? याकडे राजकीय वतुळाचे लक्ष असेन.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत-जामखेडला जाणीवपूर्वक सभा घेतली नसल्याचे मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे बोलून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी आपल्या पराभवाचे खापर एकप्रकारे अजित पवारांवर फोडले. अशातच ‘थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’अशी सूचक आणि मिश्किल टिपण्णी करीत, अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिंदेंसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर कर्जत-जामखेडच्या निकालानंतरही हा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. या मतदासंघातील राजकारण रोज नवनवे वळण घेत असतानाच, अजित पवारांना आणून संध्या सोनवणे या कोणाचा ’गेम’ करणार ? की, राष्ट्रवादी काँग्रेस आपले ‘प्रमोशन’ करून पक्ष संघटनेत आपले स्थान बळकट करणार, हे महोत्सवात नक्की दिसेल.