पुणे

लोणी काळभोर व परीसरात दहशत माजवनाऱ्या कोयता गॅंगच्या फिरोज शेख टोळीवर मोक्का

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर, : लोणी काळभोर व कदम वाकवस्ती परिसरामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगून खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा जमाव करुन दहशत करणे,तसेच कोयात्याचा धाक दाखवून मारहाण करत गंभीर जखमी करणे, असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या फिरोज शेख याच्या कोयता गँग टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.

फिरोज महंमद शेख (वय २९ रा. घोरपडे वस्ती कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे), अस्लम अन्वर शेख, वय २५ वर्षे, रा. जयहिंदनगर झोपडपट्टी, लोणीस्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे.) व आदित्य प्रल्हाद काळाणे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) या गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विनोद साहेबराव झेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झेंडे हे कदम वाकवस्ती येथील इंदिरा नगर येथे राहतात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी हातात कोयते घेऊन तेथे आले. आरोपींनी शिवीगाळ करून दरवाजावर कोयत्याने वार करुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षांची काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मागील आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

दरम्यान, वरील सर्व आरोपींनी संघटितरीत्या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. आरोपींच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला होता. आरोपींवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (३), ३(२), ३(४) प्रमाणे प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. मनोज पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलिस अंमलदार प्रशांत नरसाळे, मंगेश नानापुरे, संदिप धुमाळ, किशोर कुलकर्णी, मल्हार ढमढेरे व योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे.