पुणे / हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
सगळे जाईल पण प्लास्टिक राहील
अशी उक्ती प्लास्टिक बाबत नेहमीच वापरली जाते,कारण प्लास्टिकचे विघटन हजारो वर्षे लागली तरी होत नाही, त्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात मात्र रयत शिक्षण संस्थेच्या एस एम जोशी कॉलेज हडपसर येथील वनस्पतीशास्त्र ( बॉटनी)विभागातील प्रा.डॉ मनीषा सांगळे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे संशोधन केले आहे,त्यांनी प्लास्टिकचे विघटन करु शकणारी बुरशी शोधून काढली आहे व प्लास्टिक विघटनाच्या संशोधनात महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे या संशोधनाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ मनिषा सांगळे यांनी सन २०१२ मध्ये या संशोधनाला सुरुवात केली. प्लास्टिकचे विघटन होत नाही ही समस्या व त्याची कारणे कोणती आहेत हे डॉ सांगळे यांनी अभ्यासले. यापूर्वी झालेल्या सर्व संशोधनांचा ,विविध लेखांचा ,प्लास्टिक विघटनाकरिता जगभर झालेल्या सर्व कामांचा
त्यांनी सखोल अभ्यास केला. व त्यावर आधारित बायोरेमेडियशन ॲन्ड बायोडिग्रीडेशन या विषयावर आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचा लेख प्रकाशित झाला.
तदनंतर त्यांनी यावर थांबायचे नाही असे ठरवून पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक विघटन करणाऱ्या बुरशीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांनी चार टन माती गाळून घेतली त्यावेळी रेडीअमचा शोध लागला, अगदी त्याच प्रमाणे अथक संशोधनानंतर डॉ. सांगळे यांच्या लक्षात आले की ,खारफुटीच्या झाडाच्या मुळाशी असलेल्या बुरशी या प्लास्टिक विघटनास मदत करीत आहेत ,मग या बुरशीचा शोध घेण्यासाठी डॉ.सांगळे यांनी या संशोधनातील आपले सहकारी मोहम्मद शहानवाज व डॉ.आडे यांचे समवेत भारत भ्रमण करायला सुरुवात केली.
तब्बल तीन वर्षे त्यांनी खारफुटी प्रवण क्षेत्रातील गुजरात पासून केरळ पर्यंत अनेक ठिकाणे पालथी घातली.अनेक खारफुटीच्या झाडांवरील बुरशींचा त्यांनी अभ्यास केला. त्यातील 12 ठिकाणांवर त्यांना प्लास्टिक विघटन करणारी ही बुरशी अधिक मात्रेने आढळली. या ठिकाणाहून डॉ. मनीषा सांगळे यांनी 130 प्रकारच्या बुरशी प्रयोगशाळेत जमा केल्या.जमा केलेल्या या बुरशी मधून प्लास्टिक विघटन घडवून आणणाऱ्या 10 बुरशींची त्यांनी निवड केली त्यातील देखील अधिक प्रभावी प्राधान्याने दोन बुरशींची निवड त्यांनी केली त्यानंतर एसपरगिल्स या गटातील बुरशीमुळे पॉलिथिन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल)हे कमकुवत होऊन 94 टक्के एवढी प्लास्टिकची तन्यता कमी होण्यास मदत होत असून प्लास्टिकचे वजन 50 टक्केहून कमी होत असल्याचे डॉ.सांगळे यांच्या निदर्शनास आले. व अखेर प्लास्टिक विघटन करु शकणारी बुरशी शोधण्यात त्यांना यश आले.
या संशोधनाची दखल विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या नेचर या आंतरराष्ट्रीय मॅगझिनने देखील घेतली , हे संशोधन सिद्ध करणारे दोन संशोधन पेपर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले,व पुण्याच्या डॉ. सांगळे यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन पोहोचली.या संशोधन कार्यात एस एम जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांनी डॉ.सांगळे यांना संशोधनाकरिता पोषक वातावरण उपलब्ध करून तर दिले तसेच सतत प्रेरणा दिली.
या त्यांच्या संशोधन कार्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ.भाऊसाहेब कराळे, सहसचिव विजयसिंह सावंत ,दिलीपआबा तुपे ,चेतन तुपे यांनी सांगळे यांचे अभिनंदन केले.
प्लास्टिक विघटन कार्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आगामी काळात या संशोधनाचे पेटंट घेणे करिता डॉ.मनीषा सांगळे व त्यांचे सहकारी प्रयत्न करणार आहेत.त्यांचे
बायोरेमेडिएशन टेक्नोलॉजी फॉर प्लास्टिक वेस्ट हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे त्यांचे मनापासून अभिनंदन!