जेव्हा दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी औरंगाबादेत येतो…
औरंगाबाद : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्ष जुनी अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची.. सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती.रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही, मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं.ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो.काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.