मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा उडालेला धुव्वा आणि खुद्द नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, बसवराज पाटील यांची कार्याध्यक्षपदी नेमणूकीची घोषणा येत्या दोन दिवसात करण्यात येणार असल्याची शक्यता आहे,
लोकसभा निवडणुकीत राज्यात चंद्रपूर वगळता काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला आहे. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा स्वतःच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय नक्की केला असल्याचे समजते.राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील निर्णयप्रक्रिया ठप्प झाल्यात जमा झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.तशा हालचाली सुरू झाल्याने येत्या एक-दोन दिवसांमध्ये हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.