मंत्र्यांनी आपसात समन्वय ठेऊन राज्याचा कारभार करावा
शरद पवार यांनी केल्या सूचना
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
मुंबई : (प्रतिनिधी)
राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर पवार यांनी काल पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांना मार्गदर्शन करताना पवारांनी राज्यासमोरील आव्हानांचा धांडोळा घेताना शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची सूचना केली. नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील कामकाज तसेच प्रशासकीय यंत्रणेची माहितीही पवार यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पवारांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली. मंत्री म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या कामांना प्राधान्य द्यावे. पालकमंत्री हा सरकार आणि पक्षाचा चेहरा असतो. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा अशी सूचना पवारांनी केल्याचे मलिक म्हणाले.