रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे – पुणे जिल्ह्यात रेशनिंगवरील धान्याचा पुढील ५ महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असून नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
आपण स्वत: आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राम यांनी माहिती देताना राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार १ एप्रिलपासून गरजू कुटुंबांना रेशन दुकानातून धान्य उपलब्ध होऊ शकेल असे सांगितल्याचे स्पष्ट करून खासदार डॉ. कोल्हे यांनी रेशनिंग वरील धान्याअभावी कुणीही उपाशी राहणार नाही ही प्रशासनाची भूमिका असून ती अत्यंत स्तुत्य आहे असे त्यांनी सांगितले.
“कोरोना”च संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी गरजू कुटुंबांना तीन महिने पुरेल इतकं धान्य रेशनिंग दुकानातून दिले जाईल असे स्पष्ट केले असतानाही शिधापत्रिकाधारक नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्याचबरोबर परराज्यातून नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या नागरिकांनी स्थलांतर करू नये. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले असतानाही उपासमारीच्या भीतीने स्थलांतर होताना दिसत आहे.
या संदर्भात सातत्याने अनेकांचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. कोल्हे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. राम यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी श्री. राम यांनी एक एप्रिलपासून गरजू कुटुंबांना रेशन दुकानात हे धान्य उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता जिथे आहेत तिथेच राहून “कोरोना”चा मुकाबला करावा. “कोरोना”चे संकट अभूतपूर्व असे आहे. सारे जग या संकटाशी संघर्ष करीत आहे. तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.