रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (अनिल मोरे)
पुणे महापालिका हद्दीतील मोठ्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक उपचार जीव धोक्यात घालुन केले जात आहेत, शासनाकडून वैदकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात नसल्याने डॉक्टर व कर्मचारी यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणू प्रसार वाढत चालल्याने वैदकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, वाढत चाललेली संख्या राज्य सरकार साठी डोकेदुखी बनली आहे, शासन सर्वतोपरी प्रयत्न आपल्या परीने करत आहे मात्र पुण्यात मोठ्या हॉस्पिटल व कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे, हडपसर मधील एका खासगी मोठ्या रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत व त्यावर उपचार देखील केले जात आहेत, येथील 73 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने डॉक्टर व हॉस्पिटल स्टाफ मध्ये आधीच घबराटीचे वातावरण आहे, त्यातच शासनाकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना रुग्णांवर पालिकेच्या शहरी गरीब योजनेत उपचार करण्यास शासनाकडून सांगितले जात आहे, पुण्यातील हॉस्पिटलचे आधीच शहरी गरीब योजनेचे कोट्यावधी रुपये पालिकेकडे थकले आहेत, आधीचे पैसे मिळत नाहीत त्यात नवीन रुग्णांवर उपचार करणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती रुग्णालयांची आहे.
हडपसर परिसरात आजारी पडल्यानंतर हडपसर मधील खासगी मोठ्या हॉस्पिटलचा पर्याय आहे, येथे सध्या कोरोना रुग्ण ऍडमिट होत आहेत, परंतु शासनाकडून कोणतेही किट किंवा सुविधा पुरविल्या नाहीत, त्यातच डॉक्टर व नर्स आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, रुग्णांवर उपचार करताना वैदकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने खासगी रुग्णालयास वैदकीय सोयीसुविधा पुरवाव्यात तसेच कोरोना रुग्णांचा सर्व वैदकीय खर्च शासनाने करावा अशी मागणी होत आहे.
लॉक डाऊन शासन मदत कधी करणार?
अनेक राज्यात लॉक डाऊन मुळे नागरिकांच्या खात्यात पैसे व तीन महिने पुरेल एवढे धान्य दिले आहे महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या खूप वाढली आहे, लॉक डाऊन संपेल असे वाटत नाही तरी अद्याप शासनाकडून नागरिकांना धान्य किंवा मदत मिळालेली नाही, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मात्र आता कुटुंब पोसण्याची चिंता सतावत आहे, शासनाने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोप्रतिनिधींकडून मदतीची अपेक्षा….
पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक लोकप्रतिनिधी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत, मात्र काही लोकप्रतिनिधी गायब झाल्याचे चित्र असल्याचे मत मतदार व नागरिक व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधीनी अशा आपत्कालीन परिस्थिती मध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे अशी मागणी होत आहे. नागरिक लॉक डाऊन कधी संपेल या भीतीदायक वातावरणात जगात आहेत.