पुणे : (प्रतिनिधी)
शहरात करोनाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास करोना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या प्रभागात असलेल्या खासगी डॉक्टरांसह, महापालिका दवाखान्यात असलेले डॉक्टर तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून स्वखर्चाने अंग रक्षक किट (Safety Kit) देण्यात येणार आहेत.
करोनाचा प्रसार वाढल्याने अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले आहेत. तसेच सुरक्षा साधने नसल्याने ते सर्दी, खोकला तसेच तापाचे रुग्ण तपासात नाहीत. तर काही जण आपल्याकडे असलेल्या सुरक्षा साधनांचा उपयोग करून जीव मुठीत घेऊन रुग्णसेवा पुरवीत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना सुरक्षेसाठी नाना भानगिरे यांनी स्वतः पुढाकार घेत हे सुरक्षा किट मागविले आहेत. ते डॉक्टरांना वाटप करण्यात येत आहे. या शिवाय या प्रभागात असलेले महापालिकेचे दवाखाने, त्या ठिकाणी आलेले डॉकटर, नर्सेस, या भागात करोनाच्या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले महापालिकेचे कर्मचारी आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी आणि अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनाही ही सुरक्षा किट पुरविली जाणार असल्याचं भानगिरे यांनी सांगितले. तसेच 200 सुरक्षा किट मागविण्यात आले असून आता पर्यंत 70 किट वाटप करण्यात आले आहे.
आठ ठिकाणी निर्जंतुकीरण कक्ष
दरम्यान, भानगिरे यांनी आपल्या प्रभागात आठ ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रभागातील नागरिक ज्या ठिकाणी भाजीपाला तसेच अन्नधान्य घेण्यासाठी येतात त्या भागात सोशल डिस्टनसिंग ठेऊन अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या निर्जंतुकीकरणासाठी हा कक्ष वापरण्यात येत आहे