नई दिल्ली : देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी लॉकडाउन आणखी शिथिल करण्याची चर्चा सुरू असतानाच रविवारी देशभरात १९,९०६ नवे करोना रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. भारताने ५ लाख रुग्णांचा आकडा पार केल्यामुळे मोठी रुग्णसंख्या असलेला भारत हा चौथा देश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या १६,०९५ झाली आहे. तीन लाख ९ हजार ७१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर दोन लाख ३ हजार ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
देशभरात महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यांमध्ये अनुक्रमे १ लाख ५२ हजार ७६५, ७७ हजार २४० आणि ७४ हजार ६२२ रुग्णांची नोंद झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ७९ लाख ९६ हजार ७०७ करोना चाचण्या करण्यात आल्या. गेल्या २४ तासांत २ लाख २० हजार ४७९ नमुना चाचण्या करण्यात आल्याचे शनिवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.