अवघ्या 39 दिवसांत 4 लाखांची भर
नवी दिल्ली -देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील सक्रिय बाधितांपैकी 85.50 टक्के महाराष्ट्रासह 8 राज्यांत आढळले आहेत. त्या राज्यांमध्ये देशातील सुमारे 16 हजार मृतांपैकी 87 टक्के मृतांची नोंद झाली आहे.
सक्रिय बाधितांची संख्या मोठी असलेल्या राज्यांत दिल्ली, तामीळनाडू, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशचा समावेश आहे. देशातील सक्रिय बाधितांची संख्या 2 लाखांच्या घरात आहे. देशात मागील काही दिवसांत बाधित आणि बळींच्या संख्येत मोठी भर पडत आहे.
शुक्रवार सकाळपासून 24 तासांत देशात नवे 18 हजार 552 करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील नवा उच्चांक ठरला. देशात सलग चौथ्या दिवशी 15 हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे बाधित संख्येचा 4 लाख ते 5 लाख हा टप्पा ओलांडण्यास देशाला अवघे 6 दिवस लागले. देशातील बाधितांची संख्या 1 लाख होण्यास 110 दिवसांचा कालावधी लागला. मात्र, पुढील 39 दिवसांतच बाधितांच्या संख्येत तब्बल 4 लाखांची भर पडली. त्यामध्ये चालू महिन्यातील (जून) 27 दिवसांत आढळलेल्या 3 लाख 18 हजारांहून अधिक बाधितांचा समावेश आहे.
देशातील सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीतील बाधितांची संख्या 80 हजारांच्या घरात पोहचली आहे. तामीळनाडूत सुमारे 78 हजार तर गुजरातमध्ये 30 हजारांहून अधिक बाधित आहेत. करोना संसर्गामुळे महाराष्ट्रात 7 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत सुमारे 2 हजार 500 बळींची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये करोनाने जवळपास 1 हजार 800 बाधितांचा बळी घेतला आहे.