खालापूर : – प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल 27 लाख रुपये आणि दागिने हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रियसीने प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर भामट्या प्रियकराने त्याचे लग्न झाल्याचे एक वर्ष लपून ठेवत प्रियसीकडून पैसे लुबाडत राहिला. प्रियकराने 27 लाख 50 हजार 940 रुपये आणि दागिने हडप केले. याप्रकरणी संतोष लक्ष्मण जंगम (रा. घोसाळवाडी. ता. पनवेल) याच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोलीतील विरेश्वर सोसायटीत राहणाऱ्या महिलेचे आणि संतोष जंगम याचे मार्च 2019 पासून प्रेमसंबंध होते. संतोषने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत तिची वेळोवेळी शारिरीक पिळवणुक केली. खोपोलीत नवीन खोली घेऊन असे सांगून तिच्याकडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने तसेच पार्लरचा व्यवसाय करण्यासाठी आणलेले सामान घेतले. काही दिवसांनी याबाबत तिने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत संतोष जंगम विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर करीत आहेत.