मुंबई | सरकारी सूचनांचं पालन करत उत्सव साजरा करता येऊ शकतो. संकट काळात सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. मग गणेशभक्त व राजाची ताटातूट कशाला?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. गणेशमुर्ती स्थापन न करण्याच्या मंडळाच्या निर्णयावर शेलार यांनी नाराजी व्यक्त केलीये.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय. पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे, असं शेलार म्हणाले.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्यच पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे, असं शेलारांनी म्हटलंय.
संकट मोठं आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुध्दा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकतं, असं शेलारांनी सांगितलं आहे.
‘सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती’