मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी आज (मंगळवार) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी हे देखील उपस्थित होते. तसेच, यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील पक्ष प्रवेश केला व त्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. लॉकडाउन काळात चित्रपट सृष्टीतील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या या समस्यांना पाहून, त्या सोडवण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला असल्याचे प्रिया बेर्डे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या की, कित्येक वर्षे सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव आहे. त्या दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून मार्ग देखील काढला. मात्र आता आपण सर्व करोना विषाणूचा सामना करत आहोत. त्याच दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीच्या हाताला काम नाही. त्यांना अधिक प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आपण राजकारणात जाऊन हे सर्व प्रश्न निश्चित सोडवू शकतो, या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता राजकीय जीवनाला सुरुवात केली असून, येत्या काळात आजवर कलावंत मंडळींना जो त्रास भोगावा लागला आहे. त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांची नावं पुढे येत आहे, त्यामुळे तुम्ही पक्षात प्रवेश केला का? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मी अगोदरच कलाकार असून मला विधान परिषदेवर जायच म्हणून मी या पक्षात प्रवेश केला नाही. माझ्या क्षेत्रातील मंडळीचे प्रश्न सोडविणे हे माझे काम असणार आहे. तसेच पक्ष जी जबाबदारी देईल, त्यानुसार येत्या काळात काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा अभिनय देखील राजकारणात येणार का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, माझी दोन्ही मुलं त्यांच्या क्षेत्रात चांगले काम करत असल्याने, त्यांचा राजकारणात येण्याचा प्रश्नच नाही.