करोना संकट आणि टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग-व्यवसाय अडचणीत आहेत. टाळेबंदीच्या नियमात शिथिलता आणली असली तरी नागरिकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. त्यातून उद्योगांना सावरण्यासाठी किमान सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उद्योगांना मदत करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.
शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात व्यापार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी उद्योग-व्यवसायांच्या स्थितीवर भाष्य केले. ‘करोनाचा सर्वच व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला आहे. करोनामुळे राज्यातील अन्य कामे आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. शहराच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. ती रास्त आहे. मार्के टचे विकेंद्रीकरण करण्यात यावे, व्यवसायासाठी शहरालगतची जागा द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे, असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. त्यादृष्टीने राज्य अणि केंद्र सरकारने उद्योग- व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत.
उद्धव ठाकरे यांची पाठराखण
महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. राज्याच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यांचे काम समाधानकारक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. टाळेबंदीस मुदतवाढ, पोलिसांच्या बदल्या यावरून सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. मात्र, आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या पारनेर येथील नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाचा मुद्दा खूप छोटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. नेतृत्व करणारी मंडळी मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडली की गर्दी होण्याचा धोका असतो. आम्ही तो टाळत आहोत. राज्य सरकारच्या १४-१४ तास बैठका होत आहेत. विरोधकांनी विनाकारण टीकाटिप्पणी टाळावी, असेही पवार म्हणाले.